Monday, November 27, 2006

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?


तुला लागतो चहा,

मला लागते कॉफ़ी

तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी

तुला वाटते थंडी,

मला होतं गरम

तू आहेस लाजाळू,

मी अगदीच बेशरम

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ १ ॥

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे

आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे

मी मात्र झोपतो १२ च्या नंतर

रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ २ ॥

फ़िरायला आवडतं, आवडतं तुला शॉपिंग

कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग

मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा

कळत नाही रंग राखाडी आहे की काळा

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ३ ॥

घालतो मी शर्ट इस्त्री न करता

जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता

तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट

बाहेर निघताना नखरे सतराशे साठ

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ४ ॥

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा

जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा

तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण

बारीक तुझी नजर, डोळे आहेत की दुर्बीण?

तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ५ ॥

१ सांगू का तुला?

हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?

ऊन आणि सावली राहतात ना जसं

तुझं आणि माझं जमेल का तसं? ॥ ६ ॥

No comments: