पाऊस नसतोच कधी वेडापिसा
वेडे असतोत आपण
आपणच करीत असतो त्यावर
आपल्या स्वप्नांची पखरण
पाऊस नसतोच कधी आपला, आपल्यासाठी
आपणच दिवाणे असतो पावसाचे
म्हणूनच त्याच्या भरून येण्याला आपण
मानू लागतो फळ आपल्या नवसाचे
पाऊस नसतोच कधी
आभाळभर गरजणारा, मातीभर पसरणारा
तो असतो फक्त एक मोर
आपल्याच धुंदीत पिसारा फुलवून रानभर नाचणारा
पाऊस नसतोच कधी आपला मित्र वगैरे
गृहीत धरतो त्याला उगाचच आपण
आणि करत जातो त्याच्या भोवती
आपल्या भावबंधांची गुंफण
पाऊस नसतोच कधी आपला सोबती
आपण उगीचच ऐकवतो त्याला गऱ्हाणी
त्याची चूक इतकीच की तो म्हणत नाही कधी
माझ्यासमोर नकोत असली रडगाणी
पाऊस नसतोच कधी डोळ्यातून बरसणारा
आपल्यालाच असते सवय अतिशयोक्ती करण्याची
नाहीतर आभाळाला तरी काय गरज होती
असं आतून गहिवरून येण्याची
खरं तर
पाऊस नसतोच कधी खरा पाऊस
ते असतं फक्त आपलं म्हणणं
नाही तर
त्याला तरी कुठे मान्य आहे
असं जीव तोडून बरसणं
No comments:
Post a Comment