माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!
तिचं बोलणं; तिचं हसणं;
जवळपास नसूनही जवळ असणं
जीवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !!
खट्याळ पावसात चिंब न्हायच !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!
केसांची बट तिने हळूच मागे सारली....
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक कण मनात साठवतो !
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारंच आठवतो
प्रत्येक क्षण मनात साहवतो !
आठवणींच चांदणं असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!
तिची वाट बघत आपण उभे असतो.....
ठरलेली वेळ कधीच टळलेली असते !
येरझाऱ्या घालणं सुद्धा शक्य नसत रस्त्यावर !
सगळयांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणासं येतात, माणासं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात !
उभे असतो आपण आपले मोजीत श्वास
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !! इतकी शांत ! इतकी सहज !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळीच आली होती जशी काही !!
मग तिचा मंजूळ प्रश्न : "अय्या ! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तर: नुकताच ग ! तुझ्या आधी काही क्षण !
काळावर मात अशी ! तिच्यासोबत भुलत जायच !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!
एकच वचन कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !
तरी सुद्धा आपले शब्द प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा हवे असतात !!
साधंसुधं बोलताना ती उगीच लाजू लागते,
फ़ुलांची नाजूक गत, मनात आपल्या वाजु लागते !!
उत्सुक उत्सुक सरींनी आभाळ मनावर भरुन जातं ;
भिजलेल्या मातीसारखं आपलं असणं
सुगंधाने भरुन जातं
भरलेल्या ढगासारखं मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायच !!
No comments:
Post a Comment