Wednesday, May 31, 2017

भक्ति गीत


स्वामींच्या भजनी तल्लीन झालो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

निराकार निरामय मनोहारी रूप
सगून रुपी अवतरले स्वामी भूमीवर
द्वारी दर्शनासी आज मठी आलो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

गळ्यात तुळशी रुद्राक्षाच्या माळा
मस्तकी शोभे चंदनाचा टीळा
कस्तुरीच्या गंधे सुगंधित झालो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

ध्यास एक नामाचा चित्त जडो पायी
चूक भूल स्वामी राया पदरात घेई
अहंभाव सोडुनिया शरण मी आलो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

दिगंबर दत्तावतारी स्वामी परब्रह्म
करूणाकारी कैवारी दयेचा सागर
कृपा करी दिनावरी समरूप झालो
पाहुनी दत्त रूप आनंदात न्हालो

अरविंद भांगरे 

No comments: